कॉल ऑफ द हिल्स

चित्रा वैद्य निसर्गचित्रकार आहेत आणि ‘कॉल ऑफ द हिल्स’ या मालिकेतले पहिले प्रदर्शन 2012 मध्ये त्यांनी केले होते. पश्चिम घाटाच्या पर्वतराजींमधला निसर्ग हा त्यांच्या चित्रांचा विषय होता. आता हे दुसरे प्रदर्शन हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा हिमालय पर्वताच्या कुशीतील अद्भूत निसर्ग, लोकजीवन आणि तेथील संस्कृती यावर आधारित आहे. चित्रा वैद्य यांचे जलरंगावरील प्रभुत्व सर्वांच्या परिचयाचे आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे तैलरंग, मिश्र माध्यम, चारकोल अशी विविध माध्यमे त्यांनी जलरंगाच्याच सहजतेने हाताळली आहेत. माध्यमांची विविधता आणि निसर्गाशी एकरूप असलेले लोकजीवनाचे दर्शन ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.

हिमालयाच्या कालातीत सौंदर्याने आणि गूढतेने आजवर अनेकांना आकर्षित केले आहे. निकोलस रोरिक हे अशा चित्रकारांमधले प्रमुख नाव. हिमालयाचे प्रकाशानुसार बदलणा-या रंगांचे विभ्रम असीम अवकाश आणि त्यातून निर्माण होणारे आकृतिबंध चित्रा वैद्य यांनी आपल्या चित्रांमधून टिपले आहेत. या प्रदर्शनातील काही चित्रे निसर्गचित्रणाची आजवरची यथार्थवादी आणि सौंदर्यवादी परंपरा सांभाळणारी आहेत. पानाफुलांचे चित्रण, पार्श्वभूमीवर पर्वतराजी आणि पुढ्यात एखादा वळणदार रस्ता आणि एखादी मानवाकृती अशा पद्धतीची ही चित्रे आहेत.

चित्रा वैद्य यांनी या सांकेतिकतेपलीकडे जाण्याचा प्रयत्न काही चित्रांमध्ये केला आहे. ‘व्हिलेज ऑन द माऊंटन स्लोप’ हे ड्रॉईंग आणि त्याचेच तैलरंगात केलेले चित्र पाहिले तर त्यातला माध्यमांचा फरक तर लक्षात येतोच पण एकाच परिसराचे चित्रण करताना आलेल्या दोन वेगळ्या भाववृत्तींचा प्रत्यय येतो. फक्त काळ्या रेषांमध्ये केलेल ड्रॉईंग तटस्थ आणि संयमित वाटते. केवळ रेषेच्या माध्यमातून आणि विविध पोतांमधून एक मनोज्ञ निसर्गचित्र इथे तयार झाले आहे. विशेषतः फिकट होत गेलेल्या आणि क्षितिजात विलीन होणा-या रेषांमधून जे अवकाशाचे निर्मितीपूर्ण भान व्यक्त होते ते या रेखांकनाला अभिजाततेचा दर्जा प्राप्त करून देते. याउलट तैलरंगात केलेले हेच चित्र त्यातल्या रंगसंगतीमुळे नाट्यपूर्ण आणि थोडेसे अतिवास्तववादी शैलीकडे झुकणारे झाले आहे. विशेषतः आकाशाचा पिवळसर मातकट रंग सा-या चित्राला एक वेगळे परिमाण देतो.

मिश्र माध्यमामध्ये केलेल्या ‘कुमाऊं माऊंटन्स’ चित्रामध्ये हिमालयाची पर्वतशिखरे म्हणजे अमूर्ततेकडे झुकणारे आकार होतात आणि विविध प्रकारचे रंग आणि पोत यातून नेहमी अनुभवास येणा-या परिप्रेक्ष्याऐवजी आकार अवकाशाचा एक वेगळा प्रत्यय येतो. त्यात आकाराचा ठोसपणा आणि काळाचे प्रवाही रूप दोन्हींचा संगम आहे.

तसे पाहिले तर निसर्गाला एक स्वायत्त आणि स्वयंभू अस्तित्व आहे. पण त्याला मानवी संस्कृतीचा स्पर्श झाला की या निसर्गाचीही एक वेगळी ओळख निर्माण होते. त्याला एक सांस्कृतिक चेहरा लाभतो अशा हिमाचल प्रदेशातल्या मानवी संस्कृतीच्या खुणा टिपणारी काही चित्रेही या प्रदर्शनात आहेत. त्यापैकी काही स्थिरचित्रे आहेत तर काही चित्रांमध्ये धार्मिक तसेच वास्तुरचनेशी संबंधित संदर्भ आले आहेत. उदाहरणार्थ, ‘टेम्पल इन हिमाचल प्रदेश’, ‘सेन्ट मेरीज चर्च’ या चित्रांमध्ये मंदिरावरची उंच निमुळती कौलारू छपरे, बांधकामामध्ये लाकडाचा केलेला वापर, चर्चच्या अंतर्भागातला विशिष्ट माहोल यांचे चित्रण येते. स्थिरचित्रांमध्ये प्रत्यक्ष माणसे नसली तरी चहाची किटली, चहाचे ग्लास, पेटलेली चूल अशा तपशिलांमधून मानवी संस्कृतीची ऊब जाणवल्याशिवाय राहात नाही. या चित्रांची करड्या रंगांनी बनलेली उदास रंगसंगती आणि चुलीतल्या पेटत्या जाळाने, केशरी रंगाने चित्रात आलेले चैतन्य यामुळे ही चित्रेही उठावदार झाली आहेत.

‘कॉल ऑफ द हिल्स’ म्हणजे निसर्गरूप चैतन्यशक्तीला घातलेली साद आहे. चित्रा वैद्य यांच्या चित्रांमध्ये त्याचे आल्हादक पडसाद उमटले आहेत.

- दीपक घारे