Dr. Bhalchandra Gore, Faculty at CMS, Pune


नमस्कार! मी भालचंद्र गोरे, सेण्टर फाॅर माॅडेलिंग अँड सिम्युलेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक आहे.

माझा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झाले. लहानपणापासूनच विज्ञान आणि गणित यांची आवड मला होती. आजुबाजुला घडणार्‍या घटनांबद्दल असणार्‍या कुतुहलामुळे तसेच शाळेच्या शिक्षणामुळे हे घडले. वीज, अग्नी, रासायनिक द्रव्ये यांनी मला नेहेमीच आकर्षित केले आणि हे सर्व निसर्गनियमांना बांधील असते तसेच गणिताने हे समजणे सोपे होते हे हळूहळू उमगत गेले. जरी हा अभ्यास सोपा होण्यासाठी तंत्र आवश्यक असते हे कळले तरीही इंजिनिअर व्हायचे नाही हे मी लवकरच ठरवले.

सहाजिकच मी वैज्ञानिक संशोधनाकडे वळलो. ह्या प्रवासात मला हेही उमगले की मी कठीण वैज्ञानिक तसेच गणिती संकल्पना समजून घेऊन त्या इतरांना शिकवणे मला जमते. यातुनच मी शिक्षक होऊ शकतो असे कळले.

भौतिकशास्त्र विषयात पीएचडी केल्यानण्तर मी सॅफ्टवेअर इंडस्ट्रीमधे काम केले. परंतु कायमच वैज्ञानिक तसेच तांत्रिक विषयांशी संबंधित प्रोग्रॅमिंगच केले उदा. काॅम्प्युटेशनल केमिस्ट्री, टेलिकाॅम उपकरणांचे संयोजन, वाहने आणि इमारती यांची रचनात्मक स्थिरता तपासणे वगैरे.

बारा वर्षांनंतर वैज्ञानिक काम कमी तर व्यापार आणि मनुष्यबळ व्यवस्थापन जास्त असे कामाचे स्वरूप होते आहे असे वाटल्यावर मी शिक्षण क्षेत्राकडे परत आलो.
या सर्व प्रवासात मी नेहेमीच वैज्ञानिक आणि तांत्रिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गणिताचा कसा उपयोग होऊ शकतो हे पाहून अचंबित होत आलो आहे. तुम्हीसुद्धा या अद्भुत विषयाची मजा चाखायची संधी गमावू नका. या जगात तुमचे स्वागतच आहे.

See related videos

See videos related to faculty and students of the Centre for Modeling and Simulation, Pune