X
Login
 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register
One artwork is added in the cart
One artwork is shortlisted

एक सुंदर प्रवास ... चित्रकलेच्या दुनियेतला

- मिलिंद साठे

 

'इंडियाआर्ट गॅलरी' सुरू झाल्यानंतरच्या काळात मी आयोजित केलेल्या सुरुवातीच्या उपक्रमांपैकी एक उपक्रम मला आजही अगदी स्पष्ट आठवतो. हा उपक्रम होता तो म्हणजे एका अनाथाश्रमातल्या मुलांसाठी आयोजित केलेली चित्रकलेची कार्यशाळा आणि शॉपिंगची मजा. ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित केलेला. एका स्थानिक सुपरस्टोअरनं प्रत्येक मुलामागे शंभर रुपयांचं शॉपिंग प्रायोजित केलं होतं. मी या मुलांकडे बारकाईनं पाहात होतो. मुलांचं मात्र माझ्याकडे लक्ष नव्हतं. सगळ्याच मुलांची अशा सुपरस्टोअरमध्येसुध्दा येण्याची ही पहिलीच वेळ.

या मुलांना सूचना दिल्यानंतर प्रत्येकाला एक बास्केट देऊन शंभर रुपयांपर्यंत त्यांना आवडतील त्या वस्तू उचलता येतील असं सांगताच सगळ्यांनीच कुकीज, चॉकलेट आणि कँडी उचलल्या, परंतु काही वेळानंतर एकेक करत सगळीच मुलं आधी त्यांच्या नजरेस पडलेल्या स्टेशनरी सेक्शनमध्ये जायला लागली आणि त्यांनी पेन्सिली, क्रेयॉन्स, वह्या, स्केच पेन अशा वस्तू उचलायला सुरुवात केली . . . आधी उचललेल्या कँडी, चॉकलेट आणि कुकीजमधील काही शेल्फमध्ये परत ठेवून त्यांच्या जागी या स्टेशनरीच्या वस्तू आल्या होत्या.

हा प्रसंग सांगताना आजही मी खूपच भावनाशील होतो. या प्रसंगातून आपल्या सगळ्यांच्याच अंतरंगातली स्वतःला व्यक्त करण्याची प्रेरणा अधोरेखित होते, विशेषतः छोट्या मुलांमधली प्रेरणा.

 

हा प्रसंग असेल २००१ च्या आसपासचा. २००२ पासून मी इंडियाआर्ट गॅलरीच्या माध्यमातून चित्रकलेच्या शेकडो कार्यशाळा आणि अभ्यासवर्ग आयोजित केले. सर्व वयोगटांमधून ५००० हून अधिक मंडळी या उपक्रमांमध्ये सहभागी झाली, त्यात मुलं, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि कॉलेज विद्यार्थीही होते. जलरंगातली पेंटींग, ऑईल आणि अ‍ॅक्रिलीक पेंटींग, सुलेखन, रेखाचित्रं, व्यंगचित्रं, वारली शैलीसारखे आदिवासी कलाप्रकार अशा विविध प्रकारांचा समावेश या उपक्रमांमध्ये होता. कार्यशाळा आणि अभ्यासवर्गांशिवाय जॉन फर्नांडीस, वासुदेव कामथ, सुहास बहुळकर, अच्युत पालव, अकू झा, शि द फडणीस आणि आणखीही किती तरी सुविख्यात चित्रकारांची प्रदर्शनं व प्रात्यक्षिक मी आयोजित केली. प्रदर्शनांव्यतिरिक्त व्याख्यानंही मी आयोजित करायचो, त्यात माधव सातवळेकर, प्रभाकर कोलते, नलिनी भागवत आणि इतरही अनेक जणांची उदबोधक व्याख्याने झाली.

मी ब-याच कार्यशाळांचं आयोजन निसर्गरम्य ठिकाणीसुध्दा केलं होतं. तेव्हा 'आर्ट इंडिया फाऊंडेशन'नं एक स्वतंत्र संकल्पनाच जाहीर केली होती - 'पर्यावरणासाठी कला'. सायकलिंग, कला आणि पर्यावरणात रस असलेली मंडळी त्यामुळे एकत्र आली. गेली दोन वर्षं 'आर्ट इंडिया फाऊंडेशन' जागतिक हेरिटेज दिनाच्या दिवशी 'जनवाणी'च्या सहकार्यानं 'पुणे हेरिटेज सायकल राईड' आयोजित करत आहे. या सायकल राईडमध्ये महत्वाच्या हेरिटेज इमारतींचा समावेश असतो, सोबत एक गाईडही असतो आणि तो प्रत्येक स्थळाचं ऐतिहासिक महत्व विशद करतो.

 

जवळपास आठ वर्षं अशा स्वरुपाचे उपक्रम यशस्वीरित्या हाताळल्यानंतर मला असं वाटू लागलं, की समाजातलं सगळ्यात जास्त असं संस्कारक्षम मुलांचं जे विश्‍व असतं, तिकडे आपलं दुर्लक्ष होतंय. आर्ट गॅल-यांचं सगळं जग हे शेवटी समाजाच्या एका छोट्या वर्गापुरतंच सीमित राहतंय.

 

२०१० पासून 'indiaart.com'ने 'इंडियाआर्ट गॅलरी'मध्ये आयोजित होणा-या प्रदर्शनांचे प्रदर्शक या भूमिकेपासून भारतीय कलाक्षेत्राच्या विविध पैलूंचे सर्वांगीण सादरकर्ते या भूमिकेपर्यंत मोठंच स्थित्यंतर केलं आहे. हे Art portal सतत वृध्दिंगत होत आहे आणि नव्या नव्या बाबींची त्यात नियमितपणे भरही पडते

 

'Art India Foundation'तर्फे २०११ मध्ये 'आर्ट टू स्कूल्स' या शीर्षकाखाली मुलांमधल्या सृजनशील विचारांना चालना देईल अशा एका खूपच महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ केला. आपली सगळी शिक्षण व्यवस्थाच गुण मिळवण्याच्या कठोर अशा चौकटीनं जखडून टाकली आहे. हा दृष्टीकोन मुलांच्या सृजनशील विचारांना अजिबात उत्तेजन देत नाही. या 'आर्ट टू स्कूल्स' प्रकल्पान्वये मुलांसाठी शाळेच्या आवारातच विविध ज्ञानशाखांमधले कलाकार आणि विचारवंत यांची व्याख्यानं, कार्यशाळा आणि प्रदर्शनं आयोजित होतील. या कार्यक्रमांच्या व्हिडिओ क्लिप्स ग्रामीण भागातल्या शाळांना उपलब्ध करून देण्याच्या द्ष्टीने कार्यक्रमांचं चित्रीकरण केलं जात असतं. आजपर्यंत या प्रकल्पात मुलांबरोबर डॉ. नलिनी भागवत, चित्रा वैद्य, वीणा देव, बाबू उडिपी, अरुण ओगले, रमेश दाते, प्रा. एस डी महाजन अशा मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला. या वर्षासाठी आणखीही अशा ब-याच कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. एकूण प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.

'India Art' आणि 'Art India Foundation' व्दारे आयोजित झालेले कलाविषयक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि प्रकल्पांची छायाचित्रं, व्हिडीओ क्लिप www.indiaart.com आणि www.artindiafoundation.org या वेबसाईटवर पाहता येतील.

 

This article was published in September 2013 issue of the monthly magazine - Lalit.